भारतीय इतिहास आणि समग्र संकलनाची गरज

by | Sep 17, 2023 | General

सध्याच्या काळात आपल्यापैकी अनेक भारतीयांना आपल्या इतिहासाबद्दल पुरेशी खरी माहिती नाही. रोजच्या रहाटगाडग्यात गुरफटलेल्या जनमानसात आपला इतिहास हा किती प्राचिन आणि वैभवशाली आहे, यावर फारसा विश्वास नाही.

आपला सगळा इतिहास फारफारतर इ. पू. ४,००० ते ५,००० वर्षे इतकाच जूना आहे आणि त्याआधी इथे ‘civilisation’ असं काही नव्हतंच, असाच अनेकांचा समज आहे. आपल्याकडील रामायण, महाभारत, इत्यादी ज्या नोंदी आहेत त्या केवळ कवी कल्पना आहेत, असंच बहुतेकांना वाटतं. कारण इतक्या प्राचिन कालखंडात मुळात मनुष्यंच उत्क्रांतीच्या अतिशय प्रारंभीक अवस्थेत होता, असं अनेक ‘थोर पाश्चात्य संशोधकांनी’ अत्यंत कठीण परिश्रम घेउन, शोधून काढलंय ना!

कोणीतरी ‘आर्यन्स’ म्हणून होते, त्यांनी येउन या भागाला ‘इन्व्हेड’ करून तिला संस्कृत, संस्कृती दिली म्हणे. आणि आजवर भारताची जी काही ‘प्रगति’ झाली आहे, तीला केवळ ‘थोर आणि civilised अशा पाश्चात्यांची कृपा’ हीच कारणीभूत आहे, असं आपल्या मनात कोरूनंच ठेवलेलं आहे. जणू काळ्या दगडावरची रेघ!

त्याला कारणंही तशींच आहेत. काहीही झालं तरी, पाश्चात्यांनी आपल्या ‘अत्यंत कुशाग्र तर्कबुद्धीच्या’ आधारावर हा इतिहास ‘मांडलाय’ ना! इथे भारतातल्या लोकांना काही येतंच कुठे होतं? शेवटी ती पडली ‘uncivilised’. याला आणखी एक कारण म्हणजे आपण स्वत:च आहोत. आपणही पाश्चात्यांची चाकरी करता-करता, त्यांच्यावरील अंधविश्वासामूळे, सत्याची कास सोडली.

कारणं काहीही असोत, पण इतिहासाच्या विसर पडण्याचे फार गंभीर परिणाम आपण भोगत आलो आहेत, हे मात्र नक्की.

गेले अनेक वर्षे आपण एक प्रकारचा न्युनगंड घेउनंच जगात वावरंत आलोय. आणि एखाद्यानी जरी आपल्या प्राचिन ग्रंथावर विश्वास ठेवायचा असं ठरवलं, तरी त्यातील अनेक नोंदी स्पष्टीकरणाच्या किंवा ‘पुराव्याच्या’ अभावामूळे, आणि परस्पर विरोधाभासामूळे ‘खरंच खऱ्या आहेत का?’ असाच संशय येतो. मग काय, आणखी शोधाशोध न करता या नोंदींकडे दुर्लक्ष करून, त्यातील अफाट ज्ञानाला आपण मुकतो.

माझ्या मनात एक प्रश्न नेहमी येतो, तो म्हणजे आपल्या इतिहासातील नोंदींचं आधुनिक संशोधनाच्या आधारे स्पष्टिकरण आणि संकलन, असं काही कोणी केलं आहे का? आपला इतिहास हा ‘mythology’ नाही तर खरोखंर घडलेला आहे! असं असेल तर या घटना कधी घडल्यात? कुठे घडल्यात? या सर्व घटनांचे पुरावे सापडतात का? असतील तर ते एकमेकांना पुरक आहेत की विरोधी? त्यांचा कालक्रम ठरवला तर त्याचा मेळ बसतो का? कारण त्या वास्तविक घटना असतील तर त्या बहुतांश नोंदी वास्तववादी आणि परस्पर-पुरकंच असायला हव्यात.

वेद, वेदांत, इतिहास यांतील ज्ञान, त्यांच्यातील ‘content’, हा एक अतिशय सखोल अभ्यासाचा, साधनेचा आणि अनुभूतिचा विषय आहे. पण त्याच बरोबर, आधूनिक पद्धतिने सिद्ध केलेला आपल्या इतिहासातील घटनांची कालानुक्रमाने केलेली मांडणी, ‘context’ आणि त्यांचं परस्पर-पुरक स्पष्टिकरण नोंदवता येईल का?

या प्रश्नांची उत्तरं शोधाण्यासाठी माझ्या मते, आधुनिक संशोधनावर आधारीत, भारतीय इतिहासातील घटना कालक्रमानुसार संकलित (compile) कराव्या लागतील. या संकलनाची मांडणी मुख्यत्वे – देश, काल आणि निमित्त यांच्या आधारावर असायला हवी. म्हणजे एखाद्या घटनेची माहिती- ठिकाण (देश, स्थल, Location), वेळ (काल, time) आणि त्या घटनेचं निमित्त वर्णन (पात्रे, कारण, causality), इ. मांडून ते संकलित करायला हवं. सध्याच्या भाषेत सांगायचं तर, maps, timeline आणि encyclopedia या तीन प्रमुख गोष्टींची सांगड घालंत त्याची मांडणी करायला हवी.

आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, अलिकडच्या काळातील काही भारतीय संशोधकांनी भारताच्या इतिहासातील अनेक नोंदींवर सखोल संशोधन करून, त्यांच्या आधारे, इतिहासातील घटनांचा ‘कालनिर्णय’ शोधून काढलाय. रामायण, महाभारत, इ. अनेक घटनांचा उलगडा होताना दिसंत आहे. त्यांच्या संशोधनाचा तपशील वाचताना, तो अतिशय विज्ञाननिष्ठ वाटतोय.

या सर्वांमुळे काही गोष्टी नक्कीच सिद्ध होत आहेत, त्या म्हणजे-

१. रामायण, महाभारत, इ. इतिहास हा कवीकल्पना नसून त्यात आपल्या भारतभूमीवर खऱ्याखूऱ्या घडलेल्या घटनांच्या नोंदी आहेत;
२. त्या प्राचिन कालखंडात मनुष्य खूपंच ‘civilised’ होता; एवढंच नाही तर,
३. त्या काळी भारतवर्षातील जनजीवन हे अनेक बाबतीत सध्याच्या ‘आधुनिकते’ पेक्षाही प्रगत होतं, हेच सिद्ध होतं.

गेल्या अनेक वर्षांपासून मला राहून-राहून काही प्रश्न सतावत होते- ‘आपण काही संशोधन करू शकणार नाही, 
पण किमान त्याचं संकलन आणि समजायला सोप्या पद्धतिने मांडणी करायला काय हरकत आहे? मी ही आपल्याकडून काही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करू शकतो का?’ अशा प्रश्नांची उत्तरं शोधता-शोधता माझ्या मनात एक संकल्पना तयार होत गेली. माझ्या ‘चित्रामृत‘ प्रोजेक्टवर काम करत असतानांच ही संकल्पना विकसित झाली. किंबहूना हा त्याचाच एक अध्याय आहे, असंही म्हणता येइल. मी लवकरंच याबद्दल सविस्तर प्रकटीकरण करेन.

लेखाच्या शेवटी, माझ्या वाचनात आलेल्या आणि वर मांडलेल्या माझ्या विचारांसाठी प्रेरणा ठरलेल्या, एका घटनेचं संक्षिप्त वर्णन देतो:

ठिकाण – अलवार, राजस्थान, काल-फेब्रुवारी १८९१, निमित्तवर्णन– स्वा. विवेकानंद आपल्या अलवार येथील भेटीच्यावेळी तिथल्या एका तरूणाला संस्कृत शिकण्याचा उपदेश करतात आणि भारतीय इतिहासाबद्दल नुसता अभ्यासंच नाही तर साधना करून पुनर्मांडणी झाली पाहिजे, असं सुचवतात. ते म्हणतात,
“It is for Indians to write Indian History.”
– Sw. Vivekananda, Feb 1891, Alwar, Rajasthan

पुढे मार्गास्थ होण्यासाठी सुबुद्धी, बळ आणि कृपा लाभो अशी गणपति बाप्पाचरणी प्रार्थना! 

पुन्हा आणखी बोलूच…

-महेश रमेश देशपांडे, पुणे
( गणेश चतुर्थी: मंगळवार, भाद्रपद शु. चतुर्थी, शालिवाहन शके १९४५, Tue, 19 Sept 2023 )